Pune Vanraj Andekar Murder: पुण्याच्या नाना पेठेतली अंगाचा थरकाप उडवणारी घटना.  5 ते 6 दुचाकीवरुन आलेले 10 ते  12 हल्लेखोर क्षणाचाही विलंब न करता पिस्तुलातून गोळ्या झाडतात. तीक्ष्ण हत्याराने समोरच्यावर सपासप वार करतात. काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची भररस्त्यात हत्या करण्यात आली. मात्र त्याचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नाहीत तर त्याच्या सख्ख्या बहिणीच निघाल्या. सख्ख्या बहिणींनीच आपल्या नव-यासोबत मिळून आंदेकरच्या मृत्यूचा कट रचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपत्तीच्या वादातून सख्ख्या बहिणींनी आपल्या भावाचा जीव घेतला. वनराजच्या दोन सख्ख्या बहिणी आणि मेहुण्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. 


मागील 3 ते 4 वर्षांपासून कौटुंबिक तसंच संपत्तीबाबत त्यांचा आपला भाऊ वनराजसोबत वाद सुरु होता. गणेश कोमकरला नाना पेठेतील एक दुकान दिलं होतं. मात्र पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत दुकान पाडण्यात आलं होतं. वनराजनेच दुकानांवर कारवाई करायला सांगितल्याचा संशय कोमकरांना होता. 'तू आमच्या पोटावर उठलास, तुला सोडणार नाही', असा धमकीवजा इशारा बहिणींनी वनराजला दिला होता. त्यानंतर बहिणी त्रास देत असल्याबाबतची तक्रार वनराजने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वीच केली होती


दोन्ही बहिणींनी धमकीवजा इशारा खरा करुन दाखवला. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर वनराज त्याच्या अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. तेवढ्यात बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी आंदेकरवर एकामागोमाग एक पाच गोळ्या झाडल्या.


आंदेकर गँग ही पुण्यात गेली 40 वर्ष कुप्रसिद्ध आहे. मटका, जुगार, दारू, हफ्ते वसुली अशा अवैध कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. गुन्हेगारीबरोबरच वनराज राजकारणातही सक्रिय होता. दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून सख्ख्या  बहिणींनीच वनराज आंदेकरची सुपारी दिलीय. आणि भर चौकात गोळ्या झाडत आणि  कोयत्याने वार करुन आपल्याच भावाचा गेम केला.