Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!
मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!
Eknath Khadse : हिवाळी अधिवेशनामध्ये मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर (Mandakini Khadse) मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे खडसे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. विधानसभेमध्ये लक्षवेधीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मंदाकिनी खडसे यांच्यावर तब्बल 400 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याचा (400 Crore Fraud) आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुक्ताईनगर तालुक्यामधील सातोड येथील 33 हेक्टर 41 आर जमिनीमधून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यामध्ये, मंदाकिनी खडसे यांच्या नावावर सातोडमध्ये 33 हेक्टर 41 आर जमीन खरेदी करण्यात आली. संपूर्ण शिवार शालेय कामासाठी बिनशेती परवाना म्हणजेच (NA) करून घेण्यात आलं.
जानेवारी 2019 ला आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती मात्र तिथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजांचं उत्खनन करण्यात आलं. यामधून 400 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली, मात्र खडसेंनी हे आरोप फेटाळले आहेत. 20 हजार ब्रासची रॉयल्टी आधीच भरण्यात आलीय असं खडसे म्हणाले. या आरोपानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.