मुंबई  : महाराष्ट्रात आज ओमायक्रॉनचे ( Omicron ) आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. यातील ४ रुग्ण मुंबईतील असल्यामुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने आता धाकधूकही वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार आज सापडलेल्या चार रुग्णांपैकी 2 रुग्णांनी टांझानियाचा तर 2 जणांनी इंग्लंडचा प्रवास केला आहे. या चारही जणांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


यातील दोन कर्नाटक राज्यातील तर एक रुग्ण औरंगाबाद इथला रहिवासी असून दोन महिला आणि दोन पुरुष असल्याची माहिती मिळाली आहे. या चारही जणांची चाचणी मुंबई विमानतळावर करण्यात आली. चौघांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 


पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनची एकूण 54 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
यापैकी २८ प्रकरणे निगेटिव्ह आरटी-पीसीआर अहवालानंतर सोडण्यात आली आहेत.


राज्यात ओमायक्रॉन विषाणुचा प्रसार झपाट्याने होत आहे. आज सापडलेल्या चार नवीन रुग्णांमुळे मुंबईत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे २३ पैकी १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १० रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.