नागपूर : नागपूराच्या वेणा धरण परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी आतापर्यंत सहा मृतदेह सापडलेत. यापैकी अक्षय खंदारे, रोशन खंदारे आणि परेश कठोके यांची ओळख पटलीय. इतर एकाचा शोध सुरू आहे. तीन बोटींच्या मदतीनं बचावकार्य सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर - अमरावती महामार्गावरच्या वेणा धरण इथे रविवारी नागपूर शहरातले आठ तरुण सहलीसाठी आले. एकूण अकरा जण बोटिंग करत होते. यामध्ये 2 नावाड्यांचा समावेश होता. तलावाच्या मध्यात गेल्यावर बोटीचं संतुलन बिघडल्याने बोट पलटली. यात तिघे पोहत तलावाच्या काठावर पोहचले.


घटनेची माहिती प्राप्त होताच कळमेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. तिघांना वाडीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. बचावलेल्यांमध्ये सहलीसाठी गेलेल्या दोघांचा आणि एका नावाड्याच्या समावेश आहे. नागपूरहून अग्निशमन दल आणि एनडीआरएफची चमू शोधकार्य करतेय.


'त्या' घटनेपूर्वी केले होते मित्रांशी फेसबूक लाईव्ह


अपघात होण्याआधी काही क्षण त्यापैकी काही तरुण त्यांच्या मित्रांशी फेसबुक वर लाईव्ह चॅट करत होते. फेसबूकवर सुमारे 5 मिनिटे मित्राशी चॅट केलं. चॅट करताना जलाशयाच्या मध्य भागी गेलेल्या बोटीचे संतुलन गेल्याने हा अपघात घडल्याची शंका व्यक्त होतेय. मध्यभागी जलाशय अतिशय खोल असल्याने युवक बुडाले.