तुमच्या चिमुरड्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा!
चंद्रपूरमधून चटका लावणारी घटना. सहा वर्षांची चिमुरडी समिधा वर्गात पहिली आली, म्हणून घरात आनंदीआनंद होता.
आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमधून चटका लावणारी घटना. सहा वर्षांची चिमुरडी समिधा वर्गात पहिली आली, म्हणून घरात आनंदीआनंद होता. पण अवघे काही तासच हा आनंद टिकला. त्यानंतर जे घडलं, ते धक्कादायक होतं. फोटोत दिसणारी ही 6 वर्षांची चिमुकली समिधा दीक्षित. या गोड परीचा धक्कादायकरित्या मृत्यू झालाय. रविवारीच समिधाचा रिझल्ट लागला होता. ती वर्गात पहिली आली होती. आई बाबांनी घरात, आजूबाजूला सगळ्यांना मिठाई वाटली. घरात आनंदी आनंद होता. पण अवघ्या काही तासांत या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.
खेळताना समिधाचा कूलरला हात लागला
संध्याकाळी घरासमोर खेळताना समिधाचा कूलरला हात लागला. तिला शॉक लागला आणि ती धाडकन दूर फेकली गेली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
उपकरणांची योग्य काळजी घेण्याची गरज
उन्हाळ्यात इलेक्ट्रिक उपकरणांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यावर कूलरमध्ये शॉर्टसर्किट होतं आणि कूलरमध्ये विजेचा प्रवाह येतो, अशा वेळी योग्य अर्थिंग मिळालं नाही तर वीजेचा तीव्र प्रवाह तसाच राहतो. अशा वेळी व्यक्तीचा स्पर्श झाला की मृत्यू होतो. लहान मुलांची हाडं कोवळी असल्यामुळे त्यांना बसणाऱ्या विजेच्या धक्क्याची तीव्रताही जास्त असते. त्यामुळे घरातल्या वीजेच्या उपकरणांपासून लहान मुलांना दूर ठेवा.
चंद्रपूरचा पारा सध्या ४५ अंशांवर गेला आहे, त्यामुळे घरोघरी कुलर सुरू झाले आहेत. पण कृपया त्याची योग्य काळजी घ्या, डोळ्यांत तेल घालून मुलांकडे लक्ष ठेवा.