अमर काणे, झी मीडिया, नागपूर : वाघाच्या अवयवांची तस्करी केल्या प्रकरणी नागपूर वनविभाच्या चमूने मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावात धाड टाकून एका आरोपीला गजाआड केलं आहे. व्याघ्रदिनाचं रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ही करावाई करण्यात आली आहे .मोलाल केजा सलामे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.आरोपीच्या शेतशिवारातील घरातून मृत वाघाची संपूर्ण कातडी, पायाचे 4 पंजेही जप्त करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर वनविभागला काही दिवसांपूर्वी वाघाच्या अवयवयांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनविभागाचे पथक शिका-यांच्या मागोवा घेत होतं. दरम्यान आरोपी चकवा देत होता. गुरुवारी आरोपीच्या लोकेशनची टीप वनविभाच्या पथकाला मिळाली.त्यानंतर रात्री मध्य प्रदेशातील बिछवासहानी या गावाला जाऊन मोतीलाल सलामेला ताब्यात घेतलं.



 त्याच्या शेतशिवारातील घरातून वनविभागनं वाघाचे कातडे आणि 4 पंजेही जप्त केले. जागतिक व्याघ्रदिनी विविध कार्यक्रम साजरे होत असाताना वाघाची कातडी आणि पंजे यांची तस्करी होत असल्याचं उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मोतीलाल केजा सलामे याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


या प्रकरणात अधिक चौकशीकरिता नागपूर वनविभागाद्वारे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सावनेर यांच्या न्यायालयातून आरोपीस 3 ऑगस्टपर्यंत वनकोठडी सुनावली. वाघाच्या अवयवांची तस्करी केल्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली.  


या मागे टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. ही टोळी आंतराज्यीय आहे.या टोळीचे आंतरराष्ट्रीय लिंक आहे का ? याचा तपास करावा लागणार आहे.दरम्यान हा वाघ कुठला आहे याकरता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे फोटो पाठविण्यात आले आहेत .