Smuggling Of Onion In Marathi: देशात कांद्यावर निर्यातबंदी लावण्यात आली आहे. मात्र, टोमॅटोच्या नावे कांद्याची परदेशात तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरात ही घटना घडली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमध्ये 82.93 मॅट्रिक टन कांदा लपवून परदेशात पाठवण्यात येत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदा निर्यातबंदी असताना यूएईला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटोच्या पेट्यांमागे कांदा पॅक करुन UAEला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या टीमला मिळाली होती. त्यानुसार, टीमने सापळा रचला होता. 


सीमा शुल्क विभागाच्या टीमने मुंबईला जाऊन या कंटेनरची तपासणी केली. यामध्ये कंटेनरच्या समोरच्या भागांमध्ये टोमॅटोचे बॉक्स होते. व त्यामागे कांद्याच्या पोती लपवून तो UAEला नेण्यात असल्याचे आढळून आले. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा विदेशात पाठवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. डाळिंबाच्या बॉक्स मध्ये कांदा भरून पाठविला जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कांदा तस्करीचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. भारतातून विशेषता लासलगाव,पिंपळगाव यासह नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून बांगलादेश, दुबई यासह इतर देशात कांद निर्यात केला जातो.


 केंद्र शासनाने 8 डिसेंबर पासून कांद्यावर निर्यात बंदी घातली असल्यामुळे बांगलादेश, दुबईसह अनेक देशात कांदा टंचाई निर्माण होऊन तेथे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काहींनी वेगळी शक्कल लढवत डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदे भरून पाठवत असल्याचे समोर आले आहे. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना दुसरीकडे मात्र काही तस्कर छुप्या मार्गाने कांद्याची तस्करी करून मालामाल होत आहे. हा गंभीर प्रकार असून केंद्र शासनाने याची चौकशी करण्याबरोबर कांदा निर्यात खुली करण्याची मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर आणि कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.


निर्यातबंदीमुळं शेतकरी आक्रमक


केंद्र सरकारने 7 डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत आहे. कांद्याचे बाजार भाव चार हजार रुपये वरून एक हजार रुपये प्रतिक्विंटल झाल्याने कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे शेतकऱ्यांसाठी मुश्किल झालेला आहे.  कांदा निर्यात बंदीचा फायदा व्यापारी कांद्याची तस्करी करून एक हजार रुपये प्रति क्विंटल च्या कांद्या मागे दहा हजार रुपयांपर्यंत कमवत आहे ही कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी शेतकरी करत आहे.