स्नेहा कुलकर्णी ठरली `एरॉबॅटिक्स भरारी` घेणारी देशातील पहिली महिला
`एनडीए`च्या परेडमध्ये सारंग हेलिकॉप्टर्सच्या एरॉबॅटिक्स टीमनं श्वास रोखायला लावणारी ही प्रात्यक्षिकं सादर केली. या प्रात्यक्षिकांमध्ये एका मराठमोळ्या मुलीनंही एक नवी भरारी घेतलीय.
पुणे : 'एनडीए'च्या परेडमध्ये सारंग हेलिकॉप्टर्सच्या एरॉबॅटिक्स टीमनं श्वास रोखायला लावणारी ही प्रात्यक्षिकं सादर केली. या प्रात्यक्षिकांमध्ये एका मराठमोळ्या मुलीनंही एक नवी भरारी घेतलीय.
स्क्वॉड्रन लीडर स्नेहा कुलकर्णीचाही या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग होता. देशातल्या हवाई कवायतींमध्ये कुठल्याही महिलेनं सहभाग घेण्याची ही पहिलीच घटना.... हवाई कसरतींमध्ये भाग घेणारी स्नेहा कुलकर्णी ही पहिली महिला पायलट ठरलीय.
'सारंग' भरारी
सारंग हेलिकॉप्टर्सची टीम एअरफोर्समधली महत्त्वाची टीम समजली जाते. सारंग म्हणजे संस्कृतमध्ये मोर... मोरांच्या नृत्याप्रमाणे ही सारंग हेलिकॉप्टर्स लयबद्ध प्रात्य़क्षिकं करतात. 'एनडीए'च्या पासिंग आऊट परेडच्या वेळी या टीमनं एकाहून एक सरस अशी अकरा प्रात्यक्षिकं सादर केली. विंग कमांडर सचिन गद्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. स्नेहा कुलकर्णीचा याच प्रात्यक्षिकांत महत्त्वाचा वाटा होता.
'जबाबदारी वाढली'
हवेत उचं भरारी घेऊन अशी प्रात्यक्षिकं सादर करणं ही अभिमानाची आणि अत्यंत आनंदाची गोष्ट होती... अशा प्रकारे प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झालेली मी पहिलीच महिला पायलट होते, त्यामुळे ही प्रात्यक्षिकं यशस्वी झाल्यानंतर अनेक मुली माझ्याकडे एक प्रेरणा म्हणून पाहतायत, त्यामुळे जबाबदारीही निश्चितच वाढल्याचं स्नेहा म्हणते.
धडाडीचा वारसा...
३१ वर्षांची स्नेहा आणि तिचा भाऊ लष्करामध्ये अधिकारी आहेत. त्यांना हा वारसा त्यांचे वडील भालचंद्र कुलकर्णी यांच्याकडून मिळालाय. स्नेहा कुलकर्णी भारतीय वायूदलात २००७ साली रुजू झाली. २०१६ मध्ये एरोबॅटिक्स टीम अर्थात हवाई प्रात्यक्षिकं करणाऱ्या टीममध्ये स्नेहाचा समावेष करण्यात आला.
'एनडीए'तील महिलांचा मोलाचा वाटा
पुण्यात झालेल्या 'एनडीए' परेडमध्ये स्क्वॉड्रन लीडर स्नेहा कुलकर्णी हिच्याबरोबर कमेंट्रेटर टिंजू थॉमस आणि टीम इंजिनिअर स्क्वॉड्रन लीडर निधी या दोघींचाही महत्त्वाचा वाटा होता. लष्कराच्या विविध आघाड्यांवर महिलांचा सहभाग वाढतोय. एनडीएची ही प्रात्य़क्षिकं पाहिल्यावर एक नवी प्रेरणा मिळणार आहे.