तर मग रेल्वे मंत्र्यांचे आभार का मानले ? अजित पवारांचा भाजपला सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर टीका केली. महाराष्ट्राने जास्त रेल्वे सोडल्याचा आरोप केला. मात्र, गुजरातमधून आणि दुसऱ्या राज्यातून किती रेल्वे सुटल्या ते बघावे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर टीका केली. महाराष्ट्राने जास्त रेल्वे सोडल्याचा आरोप केला. मात्र, गुजरातमधून आणि दुसऱ्या राज्यातून किती रेल्वे सुटल्या ते बघावे. जास्त रेल्वे सोडल्याबद्दल त्यांच्या पक्षाने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार का मानले? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
राज्यात कोरोनाचे काम कसं झाले ते सगळ्यांनी पाहिलं. न्यायव्यवस्थेनेही कौतुक केलं. मजुरांना त्यांच्या गावी जायचे होते. त्यामुळे त्यांची व्यवस्था सरकारने केली. पण, काही जण राजकीय भूमिकेतून बोलताहेत.
राज्यात काही भागात दाट लोकवस्तीची शहरे आहेत. धारावीत कोरोनाचे संकट आटोक्यात आणणे आव्हानात्मक काम होते. तरीही विविध मार्गाने कोरानाचे सावट आटोक्यात आणले. पवार साहेब अशी संकटे येतात तेव्हा राजकीय भूमिका बाजूला ठेवून मदतीला धावतात. पण काहींना केवळ राजकारणच करायचे असते, अशी त्यांनी भाजपवर टीका केली.
ही भारतीय संस्कृती नाही
धर्मा धर्मात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. घटनेत काय लिहिलंय याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. आपल्या कृतीतून वातावरण खराब होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. पण, दुर्दैवाने काही जण राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी याचा वापर करताहेत. कुठल्याही जाती धर्मात एकमेकांचा विरोध करणं, अनादर करणं हे शिकवलं जात नाही. ही भारतीय संस्कृती नाही, असं पवार यांनी हिजाब वादाप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं.
चंद्रकांत दादा म्हणजे, उचलली जीभ लावली टाळ्याला
चंद्रकांत पाटील एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हेलिकॉप्टरमधून मी जमीनी बघत असतो असा आरोप त्यांनी केलाय. पण, एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. हेलिकॉप्टरने फिरायला परवानगी घ्यावी लागते, किती प्रवासी असतात त्यांची माहिती द्यावी लागते. मी कधी असं खास हेलिकॉप्टर घेऊन गेलो होतो याची त्यांनी माहिती द्यावी. उचलली जीभ लावली टाळ्याला असे ते सतत बिनबुडाचे आरोप करत असतात, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
महामंडळाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्ष झाली. आम्हाला संधी मिळाली. पण, आमदार आणि कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. अनेक कार्यकर्त्यानी भेटून महामंडळावर संधी देण्याची विनंती केली. त्यांची ही मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढच्या काळात विदर्भात अधिवेशन घेऊ
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काल अधिवेशनाचा विषय आला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होत असते. त्यासाठी नागपूर विधिमंडळाच्या इमारतीत मोठं सभागृह नाही. हिवाळी अधिवेशन ५ दिवसात संपवले. तरीही त्यानंतर ५० ते ६० आमदार, अनेक अधिकारी पॉझिटिव्ह आले.
सरकारच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, पुढच्या काळात विदर्भात अधिवेशन घेऊन तिथले प्रश्न सोडवू असं त्यांनी सांगितलं.
परीक्षेची वेळ आलीय, आता कात्रीत पकडू नका
काही शिक्षकांनी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी माझी भेट घेतली. त्यावेळी त्यांना आता परीक्षा घेण्याची वेळ आलीय. विद्यार्थ्यांना कात्रीत पकडू नका. हे फक्त स्वतःचे हित बघतात, पण आमच्या पाल्यांचा विचार करत नाहीत असा लोकांचा समज होईल असं सांगितलं आहे. मात्र, ते आपल्या संघटनांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.