पुणे : हवामान खात्याच्या माजी अधिकारी डॉ. मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर खोले यांना मोठ्या रोषाला जावे लागले. आता तर त्यांच्याविरोधात मराठा मूक मोर्चाने आंदोलनाची हाक दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोवळे मोडल्यावरुन मराठा समाजातील स्वयंपाकी महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार त्यांनी केली. हवामान खात्याच्या माजी अधिकारी डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात आता मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या २५ सप्टेंबरला पुण्यात हे आंदोलन होणार आहे.  


मराठा क्रांती मोर्चा लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान आंदोलन करणार आहे. 'सोवळं मोडलं' म्हणून गुन्हा दाखल करणाऱ्या मेधा खोले यांना अटक करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सोवळे प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.


डॉ. खोले यांनी स्वयंपाकी महिला निर्मला यादव यांच्याविरोधात तक्रार करु नये यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विनंती केली होती. परंतु खोले यांनी ही विनंती धुडकावून लावत निर्मला यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.


मेधा खोले यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर प्रकरण मिटेल असं वाटत असताना आता मराठा समाजानं खोले यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.