मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज अनेकजण नेहमी फॉरवर्ड करत असतात. काहीवेळा कमी वेळातही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा अफवा पसरविल्या जातात. असाच एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. काही खोडकर लोकांनी माणूस जिवंत असतांनाही त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याची बाब या निमित्ताने पुढे आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहिसर भागात राहणारे रवींद्र दुसांगे यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांना काही दिवसापूर्वी वाईट अनुभव आला. त्यांचे निधन झाल्याचे संदेश पसविण्यात येत होते. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार रवींद्र यांना त्यांच्या निधनाबद्दल समजले. याची खात्री करण्यासाठी काहींनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे यात अधिक भर पडली.


रवींद्र हे रविवारी पत्नी आणि आपल्या दोन मुलांसह मालाड येथे सासरी गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी मोबाईलचे नेटवर्क मिळत नव्हते. कारण ते ज्या ठिकाणी गेले होते, तेथे नेटवर्क नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशामुळे अधिकच भर पडली. ज्यावेळी ते नेटवर्कमध्ये आले असताना त्यांना अनेक मेसेज आणि ४०० कॉल आले होते. ते पाहून ते चक्रावून गेलेत. त्यांना जोरदार धक्का बसला. 


एकाने त्यांचे छायाचित्र फेसबूकवर पोस्ट करत श्रद्धांजलीचा संदेशही लिहीला. त्यानंतर ही पोस्ट व्हाटस्अॅपवरही व्हायरल होऊ लागली आणि माझ्या निधनाची बातमी पसरली, अशी माहिती रवींद्र दुसांगे यांनी सांगितली. मला त्रास झाला आणि माझ्या कुटुंबीयांनाही याचा त्रास सहन करावा लागला. मला आणि माझ्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. दरम्यान, हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर अनेक मित्रांनी आणि माझ्या कुटुंबीयांनी मोकळा श्वास सोडला, असे ते म्हणालेत.