Twin Sisters Marriage : सोलापुरातल्या एकाच तरुणासोबत मुंबईतल्या दोन उच्चशिक्षित तरुणींनी एकाच वेळी लग्न केल्याने देशभरात या विवाहाची चर्चा आहे. अतुल उत्तम अवताडे या तरुणाने रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींसोबत एकाचवेळी लग्नगाठ बांधली. लग्नाला एक दिवस होत नाही तोच अकलुज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाने दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाने फेटाळली याचिका


लग्न केल्यापासून अतुलला अडचणींना सामना करावा लागत आहे. मात्र आता अतुल आवताडेवर कारवाई करण्यास सोलापूर न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. अतुलवर नोंदवण्यात आलेल्या अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अकलुज पोलिसांनी याचिका दाखल केली होती. सोलापूर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.


मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांनी याप्रकरणाची माहिती दिली आहे. जुळ्या बहिणींशी लग्न केलेल्या व्यक्तीविरुद्ध नोंदवलेल्या अदखलपात्र गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार मिळविण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सीआरपीसीच्या कलम 198 चा हवाला देऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी अदखलपात्र खटल्याची चौकशी करण्याची परवानगी नाकारली आहे, असे शिवपुजे यांनी सांगितले.


न्यायालयाने काय म्हटलं?


खटल्यातील तक्रारदार हा पिडीत पक्ष म्हणजेच संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असावा. या खटल्यात तक्रारदार पीडित पक्ष नसल्याने या याचिकेची दखल घेऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात अतुलवर कोणतीही कारवाई होणार नसल्याच आता स्पष्ट झालं आहे. तसेच त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.


हे ही वाचा >>  जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी केलेले लग्न कायदेशीर आहे का?


494 कलमांतर्गत फक्त पती आणी पत्नीला अशा प्रकरणात तक्रार करण्याचा अधिकार आहे. तिसऱ्या व्यक्तीला यामध्ये तक्रार करण्याचा अधिकार कायद्याने दिला नाही. त्यामुळेच राहुल फुले यांनी नोंदविलेली तक्रार कायदेशीर दृष्ट्या योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे