सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेकडे प्रशासनाचा कानाडोळा
गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांना पगार मिळालेला नाही.
संजय पवार, झी मीडिया, सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा वाढत्या भ्रष्टाचारामुळे बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर सोलापूर महापालिकेची परिवहन सेवा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. सहाशे कामगार या सेवेत दिवस-रात्र काम करायचे. शहराला या परिवहन सेवेचा मोठा आधार होता. मात्र बदलत्या काळात सोलापूर महापालिका परिवहन सेवेतील वाढता भ्रष्टाचार, कामगारांचा पगार रखडणे, पगार न मिळाल्याने कामगारांची काम न करण्याची मानसिकता, पालिका अधिकाऱ्यांचा परिवहन सेवेकडे कानाडोळा आणि उदासीन प्रशासनामुळे आता ही परिवहन सेवा खिळखिळी झाली आहे. नादुरुस्त आणि खिळखिळ्या बसमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
या परिवहन सेवेला उर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून नव्या कोऱ्या १५५ बसेस आल्या आणि त्या रस्त्यावर धावू लागल्या. मात्र यातील ९५ बसेसच्या चेसी क्रॅक झाल्याने नवीन बसेस धूळखात पडल्या आहेत. यामुळे प्रशासनाची परिवहन सेवेवर पकड नसल्याचा आरोप होतो आहे. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सुर आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोलापूरची परिवहन सेवा अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे ही परिवहन सेवा वाचवण्यासाठी पालिका प्रशासनासह नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.