मंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न; पोलिसांमुळे टळला अनर्थ
Solapur News : सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी वेळीच तरुणाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा नियोजन बैठकीसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्या समोर एका आंदोलकाने तक्रार करत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात एकच गोंधळ झाला. अंगावर डिझेल ओतून या व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन हा सगळा प्रकार थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटू न दिल्याने तरुणाचा ताफ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. माढा तालुक्यातील टाकळी येथील दादासाहेब कळसाईत तरुणाचा डिझेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. नियोजन भावनाच्या बाहेर पालकमंत्र्यांचा ताफा येताच आडवे येत या तरुणाने डिझेल ओतून घेतले. त्यानंतर स्वतःला पेटवून देण्याची धमकी या तरुणाने दिली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तरुणाला रोखण्यात यश आलं.
आमदार निधीतून 2018 साली सात लाख रुपयांचे व्यायामशाळा न बांधता त्या जागी बंगला बांधाल्याचा आरोप तरुणाने केला होता. त्या संदर्भात तरुणाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घ्यायची होती. मात्र पालकमंत्र्यांना भेटू न दिल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. यावेळी हा तरुण माझी तालीम चोरीला गेली आहे, तालमीतले साहित्य चोरीला गेले असे ओरडून सांगत होता. पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मातंग समाज आक्रमक
पोलिसांच्या मारहाणीत मातंग समाजातील तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी सोलापुरातील मातंग समाज आक्रमक झाला आहे. पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीत जखमी होऊन मातंग समाजातील तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. भांडणाच्या मुद्द्यावरून पोलिसांनी मृत तरुणाला ताब्यात घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात बैठक सुरू असताना तरुणाच्या कुटुंबियांसह मातंग समाजातील काही युवकांनी त्यांना भेटण्याची विनंती केली. मात्र पालकमंत्र्यांना भेटू देत नसल्यामुळे नियोजन भावनांच्या गेटवरच मातंग समाजातील तरुणांनी ठिय्या आंदोलन केले.