अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापूर (Solapur Accident) जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये (Akkalkot) भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या क्रुझरला हा भीषण अपघात झाला आहे. केमिकल टँकर आणि क्रुझरमध्ये ही जबरदस्त धडक झाली आहे. या दुर्दैवी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. क्रुझरमध्ये प्रवास करणारे सर्वजण हे कर्नाटकमधील (Karnataka) असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण देवदर्शन करून येत होते. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. हा भीषण अपघातात क्रुझरमाधील सहा ते सात जण गंभीर जखमीदेखील झाले आहेत. जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील अणूर तालुक्यातील आळंद गावचे रहिवासी महाराष्ट्रात देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन करुन परतत असतानाच त्यांच्या क्रुझर गाडीची टॅंकरला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या धडकेत क्रुझरमधील सात ते आठ प्रवासी देखील जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे.


कसा घडला अपघात?


अक्कलकोट-कलबुर्गी रस्त्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिरवळवाडी येथे सिमेंट बल्कर गाडीला पाठीमागून क्रूझर गाडीची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली आहे. कर्नाटकातील एकमेकांचे नातेवाईक असलेले सर्व भाविक महाराष्ट्रात दर्शनासाठी आले होते. देवदर्शन करुन कर्नाटकमध्ये परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे.


बुलढाण्यात भीषण अपघात; चौघांचा जागीच मृ्त्यू


बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नजीक आज झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा समावेश आहे. सुरतवरून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे मलकापूर बायपासजवळ टायर पंक्चर झाले होते. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रसूतीसाठी घरी जात असलेल्या गर्भवती महिलेचाही मृत्यू झाला.