महाराष्ट्रातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के, सुदैवाने कोणती ही जीवितहानी नाही
या भूकंपाची रिश्टरस्केलवर 4.4 इतक्या तीव्रतेची नोंद झाली आहे.
हिंगोली 24 तास (गजानन देशमुख): जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. परंतु हिंगोली करांसाठी भूकंप ही तशी नित्याचीच बाब झाली आहे. आज सकाळी 8 वाजून 33 मिनिटांना वसमत,औढा नागनाथ,कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचे धक्के जाणवले, त्यांच्या घरावरील पत्रे आणि भांडी हलू लागल्याने नागरीक घाबरुन घराबाहेर आले. यासगळ्यात चांगली बातमी अशी की हा धक्का सैम्य असल्या कारणाने कोणतीही जीवीत किंवा वित्तीय हानी झाली नाही.
या भूकंपाची रिश्टरस्केलवर 4.4 इतक्या तीव्रतेची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या साधूनगर येथे आढळला आहे. National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून हिंगोली जिल्हा व्यवस्थापन कार्यालयाला ही माहिती मिळाली आहे.
या भूकंपाची तीव्रता पूर्वीच्या भूकंपापेक्षा मोठी आहे, तर याची व्यापकता 65 किमीपर्यंत आहे, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठे ही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आलं आहे.
हा धक्का तसा फारसा मोठा नसला तरी आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. कारण यावेळी खूप मोठा आवाज झाला होता, तर घरावरील पत्रे हलू लागले, तर भिंती आणि जमीन देखील हादरल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
असे असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा अफवा पसरवु नये असे आवाहन ही, करण्यात येत आहे. पण औंढा नागनाथ तालुक्यातील एका ग्रामस्थांच्या घराची भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे, त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत, नुकसानग्रस्त व्यक्तीचे नाव बातमी लिहिण्यापर्यंत कळू शकलेले नाही.
शिंदे, वापटी, सिंदगी, हारवाडी, पिंपळदरी, राजदरी, आमदरी, सोडेगाव, नांदापुर, म्हेसगव्हान या गावात भूकंपाचे धक्के आतापर्यंत जाणवले होते. पण यावेळी नव्याने वसमत हिंगोली कळमनुरी शहरासह जिल्ह्यातील शेकडो गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
नव्याने धक्का बसलेल्या गावांपैकी कुरुंदा, गिरगाव, किन्होळा, कानोसा, आंबा, चोंढी, सेलू, सुखळी, सोमठाणा, कोठारी, डोणवाडा, कुरुंदवाडी, पांघरा बोखारे, चोंढीबहिरोबा,आखाडा बाळापूर, वारंगा, कांडली, अकोला, बळसोंड, मेथा, कोथळज इत्यादी गावात आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर आणि यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात ही धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.
वसमत औंढा आणि कळमनुरी तालुक्यातील काही गावात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने पांगरा, वापटी पिंपळदरी भागात भूगर्भ शास्त्रज्ञांनी यापूर्वी पाहणी केली होती. पण या अभ्यासात काही महत्वाचे निष्कर्ष हाती लागले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिक भीती च्या सावटाखाली आहेत, त्यामुळे शास्त्रज्ञानी या भागात सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.