सोनोग्राफी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टला कोरोना, ६२ गरोदर महिला क्वारंटाईन
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे.
पुणे : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यातल्या शिक्रापूरमध्ये एका सोनोग्राफी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टला कोरोनाची लागण झाली आहे. सोनोग्राफी करणाऱ्याला कोरोना झाल्यामुळे ६२ महिलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या महिला ६ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान सोनोग्राफी करणाऱ्या या व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या. या सगळ्या ६२ महिलांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या सर्व महिलांचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीला चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोणत्याही गरोदर महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली नसल्याचं पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ ए प्रसाद यांनी सांगितलं आहे.
शिक्रापूरमधल्या या रेडिओलॉजिस्टने आपल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये ६९ जणांची सोनोग्राफी केली होती. यातील ६२ गर्भवती महिलांना प्रशासनाने शिक्रापूर परिसरातील चार हॉटेल लॉजमध्ये क्वॉरंटाईन केले आहे. यातील काही महिलांची डिलिव्हरी झाल्यामुळे या महिलांना आहे त्याच ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या ६२ गर्भवती महिलांना आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या टीमच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे.