त्या वादावर बोलताना राज्यपाल म्हणाले, माझी माहिती..
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झालाय. ठिकठिकाणी राज्यपाल यांच्याविरोधात आंदोलन, निदर्शने होत आहेत. राज्यपालांनी आपल्या त्या वक्तव्यावर आता सारवासारव केलीय.
जळगाव : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर संतापाचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी तर राज्यपालांना केंद्राने परत बोलवावे अशी मागणी केलीय.
राज्यपाल कालपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी जैन उद्योग समूहाला भेट दिली. तसेच, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे शुभारंभही त्यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना राज्यपाल म्हणाले, शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. समर्थ रामदास हे शिवाजी महाराज यांचे गुरू असल्याची प्राथमिक शिक्षण घेताना माझी माहिती होती.
मात्र, आता काही नवीन तथ्य मला सांगण्यात आले आहे. ते पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू असे सांगत राज्यपाल कोश्यारी यांनी अधिक बोलणे टाळले.