सांगली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अनुमप खेर आणि मनोज वाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्पेशल 26' (Special 26) हा चित्रपट सुपर हिट झाला होता. नकली सीआयडी अधिकारी (CID) बनत ज्वेलर्स आणि श्रीमंत लोकांच्या घरांवर धाडी टाकायच्या आणि कोट्यवधी रुपये लुटायचे अशी या चित्रपटाची कथा होती. 'स्पेशल 26' या चित्रपटाला शोभेल अशी एक घटना सांगलीत (Sangli) घडली आहे. सीबीआय अधिकारी बनून आलेल्या चोरट्यांनी एका ज्वेलर्सच्या दुकानात (Jewellers Shop) दरोडा (Robbery) टाकला. काही कळाच्या आतच या बोगस सीबीआय अधिकारी (Fake CBI Officers) बनलेल्या चोरट्यांनी कोट्यवधीचं सोनं लंपास केलं. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून पोलीस तापस सुरु केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
सांगली शहरातल्या मिरज रोडवरील (Miraj Road) मार्केट यार्ड नजीक असणाऱ्या रिलायन्स ज्वेलर्सच्या शोरूमवर (Reliance Jwellers) रविवारी दुपारच्या सुमारास सात ते आठ इसमानी दरोडा टाकला. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या चित्रपटातल्या कथानक प्रमाणे हा सर्व प्रकार घडला. दरोडेखोरांनी दुकानामध्ये प्रवेश करत आपण सीबीआयकडून आल्याचं सांगत, नांदेड इथल्या दरोड्यातले सोन्याचे दागिने आपल्या दुकानात विकल्याचा संशय असल्याचं सांगितलं. त्यानंतर ज्वेलर्स शॉपमधले सर्व कर्मचारी आणि ग्राहकांना एका बाजूला घेतलं आणि या सर्वांना मग बंदुकीचा धाक दाखवून हाताला चिकटपट्ट्या आणि तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या. त्यानंतर अर्ध्या तासात या दरोडेखोरांनी संपूर्ण दुकान रिकामं केलं.


योजनाबद्ध रितीने दरोडा
दरोड्याचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुकान लुटून जाताना दरोडेखोरांनी गोळीबार केला. यात एक ग्राहक जखमी झाला आहे. या दरोड्यामध्ये सुमारे 14 कोटींचे सोन्याचे दागिने, हिरे आणि प्लॅटिनम अशा मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या आहेत. अत्यंत योजनाबद्ध रितीने दरोडेखोरांनी ही चोरी केल्याचं समो आलं आहे. दरोडा टाकण्याआधी दरोडेखोरांनी या ज्वेलर शॉपची रेकी केली होती. त्यानंतर रविवारचा दिवस निवडत दुकानावर दरोडा टाकण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 
 
चारचाकी, दुचाकी जप्त
दरोडेखोरांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली चार चाकी आणि दुचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. मिरज-पंढरपूर मार्गावरील भोसे या ठिकाणी एका शेतामध्ये सफारी ही चार चाकी गाडी आढळून आली असून यामध्ये दोन रिवाल्वर आणि दरोडेखोरांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले कपडे देखील आढळून आले आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्या सोडून अन्य वाहनातून दरोडेखोरांनी पळ काढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर दरोडेखोरांच्या शोधासाठी सांगली पोलीस यंत्रणा कसून तपास करत आहे.