आशीष अम्बाडे ,झी मीडिया ,चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहराजवळ आहे वढा तीर्थक्षेत्र.  वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगमावर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वढा हे तीर्थक्षेत्र विठ्ठल-रुख्माई मंदिर आणि या वार्षिक यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. हे स्थळ चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हजारो भाविक ३ दिवस चालणा-या यात्रेसाठी वढा येथे दाखल होतात. देवदर्शन आणि वार्षिक खरेदी करून भाविक वढा येथून रवाना होतात.


चंद्रपूर जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे घुग्गूस हे औद्योगिक क्षेत्र. या परिसरात त्रिवेणी संगमावर आहे 'वढा'. कार्तिक पौर्णिमेनिमित्त वढा येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराची वार्षिक यात्रेला प्रारंभ झाला आहे. गेली शेकडो वर्षे या संगमस्थळी लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी वढा येथे दाखल होतात.


यवतमाळ जिल्ह्यातील वणी या शहरातून वाहणारी निर्गुडा नदी, रुख्मिणी मातेचे माहेर असलेल्या कौंडिण्यपूर येथे उगम पावणारी पैनगंगा नदी आणि विदर्भाची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा अनोखा संगम वढा परिसरात होतो. या त्रिवेणी संगमावर स्नान करून उंच बांधलेल्या विठू-रुख्माई मंदिरात दर्शन घेत संगमस्थळी पूजा करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. त्रिवेणी संगाच्या पात्रात शेकडोंच्या संख्येने लागणारी विविध साहित्याची दुकाने आणि खेळण्यांचे स्टाल्स यावर बच्चेकंपनीचा विशेष असतो.


तीन दिवस चालणारी वढा यात्रा चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांसाठी विशेष महत्वाची आहे. संगमाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेवर विठू-रुख्माईचे आणि बालाजीचे मंदिर, यवतमाळ जिल्ह्यात किनाऱ्यावर 'जुगाद' हे प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आणि कोरपना तालुक्यातील 'हनुमानाचे' मंदिर यामुळे इथले धार्मिक पर्यटन वर्षभर भक्तांना खुणावत असते. लाखो भाविक दरववर्षी न चुकता वढा तीर्थक्षेत्री दाखल होत आपली श्रद्धा जपतात.


दिवसात लाखो भाविक वढा या छोट्या खेड्यात दाखल होत असल्याने इथली व्यवस्था चोख राहावी यासाठी प्रशासन, पोलीस आणि आपत्ती निवारण दल यांनी खास आराखडा तयार केला आहे. नदी पात्रात भाविकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक तैनात असून आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे.