साईंच्या भक्तांसाठी `स्पाईसजेट`ची खास विमानसेवा सुरू
शिर्डीसाठी आता हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू
शिर्डी : ६ जानेवारीपासून देशातल्या १० ठिकाणांहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरु झालीय. 'स्पाईसजेट' या खासगी विमान कंपनीनं ही सेवा सुरू केलीय. त्यामुळे दूरवरून शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना दर्शनासाठी जास्त वेळ लागणार नाही. एकूण २० विमानांचं शिर्डीत आगमन आणि उड्डाण होणार आहे. यात हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू करण्यात आली आहे... तर चेन्नईहून येत्या १० जानेवारीपासून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
याचबरोबर प्रत्येक आठवड्यात मंगळवार आणि रविवार या दोन दिवशी हैद्राबादसाठी प्रत्येकी एका विमानाची अतिरिक्त फेरी सुरू करण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात शिर्डी विमानतळावर रात्रीच्या वेळीदेखील विमानाच्या आगमनाची सुविधा करण्यात येणार आहे. अर्थातच, आगामी काळात देशातील महत्त्वाची शहरं विमानसेवेच्या माध्यमातून शिर्डीशी जोडली जाणार असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय. पुढील काही महिन्यांत शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरविण्याची सुविधा सुरु होईल. त्यानंतर विमानांची संख्या वाढवण्यात येऊ शकते. यापूर्वी प्रवाशांना मुंबई आणि पुण्याला येऊन पाच ते सात तासांचा पुन्हा प्रवास करुन शिर्डीला यावं लागत होतं.
शिर्डीत १ ऑक्टोबर २०१७ रोजी विमानतळाचे उदघाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी 'एअर अलायन्स' या कंपनीने हैद्राबाद आणि मुंबई इथून सेवा सुरु केली होती. त्यानंतर हैद्राबादहून आणखी एक फ्लाईट सुरु करण्यात आली. त्या नंतर वर्षभरानं दिल्ली - शिर्डी अशी विमानसेवा स्पाईसजेटने सुरु केली होती. आता यात आणखीन चार विमानांची भर पडली आहे. 'स्पाईसजेट'ने भोपाळ, अहमदाबाद, जयपूर आणि बंगलोर अशी विमानसेवा सुरु केली आहे. ही सेवा कनेक्टिंग अर्थात जयपूर - शिर्डी - अहमदाबाद अशा मार्गानं प्रवास करतील.