SSC Exam 2023: सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता 10 वीच्या (SSC Exam) परीक्षा 2 मार्चपासून सुरु होत आहे. 2 ते 25 मार्च या कालावधीत परीक्षा होणार आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षी ऑफलाइन स्वरूपात परीक्षा (Offline Exam) झाली होती. वेळेसह काही इतर सवलती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. पण आता पूर्वीप्रमाणेच परीक्षा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावींच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
राज्यात यंदा एकूण 15,77,256 विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यात 8,44,116 मुलं तर 7,33,067 मुलींची संख्या आहे. राज्यातील 23,000 माध्यमिक शाळांमध्ये दहावीची परीक्षा होणार आहे.  पण गेल्या तीन वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा 61 हजार विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. 


गेल्या पाच वर्षात विद्यार्थ्यांची संख्या


मार्च 19 - 16 लाख 99 हजार 465


मार्च 20 - 17 लाख 65 हजार 829


मार्च 21 - 16 लाख 58 हजार 614


मार्च 22 - 16 लाख 38 हजार 964


मार्च 23 - 15 लाख 77 हजार 255


बोर्डाच्या अध्यक्षांचा अजब दावा
दहावीच्या परीक्षेची माहिती देण्यासाठी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचं कारण सांगताना त्यांनी अजब दावा केला. इतर बोर्डाच्या शाळेची संख्या वाढली आहे तसंच पालकांनी पाल्य कमी जन्माला घातल्याने संख्या घटली असं अजब वक्तव्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी केला. 


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
दरम्यान, शरद गोसावी यांनी दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार असून बारावीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही वाढीव दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमातील वेळापत्रकरावर विश्वास ठेवू  नये,  मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावं असं आव्हान गोसावी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नैराश्य येऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, असे गोसावी यांनी सांगितले.


यावर्षी 23 हजार 10  शाळांतील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ९ विभागीय मंडळात परीक्षा पार पडेल. सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात अर्धा तास आधी सेंटर वर पोहचणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबाबत मंडळ दिलगीर आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा घटकांमध्ये मंडळाच्या विश्वासार्हतेला बाधा येऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची दक्षता घेतली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केलं.