ST Strike : एसटीचा संप जीवावर बेतला, 2 कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
निलंबनाच्या भीतीने घेतला दोन एसटी कर्मचाऱ्यांचा जीव
उस्मानाबाद, सातारा : एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यातील वाद अद्याप संपलेला नाही. एका बाजूला संप आणि दुसऱ्या बाजूला संपात सहभागी झालो म्हणून निलंबन अशी टांकती तलवार एसटी कर्मचाऱ्यांवर आहे. अशा परिस्थितीत दोन एसटी कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले आहेत. निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी लावला आहे.
32 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील एका 32 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे. किरण घोडके असं या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. किरण हे अक्कलकोट आगारात चालक या पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते.
साताऱ्यातील संतोष शिंदेंचा मृत्यू
गेल्या १० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे हा संप सुरू असतानाच मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा तणावातून हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.संतोष शिंदे राहणार आसगाव असं या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मेढा एसटी डेपोत कर्मचारी होतो. तटपुंजा पगार आणि संपामुळे ते तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
राज्यसरकारने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाया सुरू केल्या आहेत. आपल्या इतर सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे किरण घोडके हे देखील अस्वस्थ झाले होते. मंगळवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. निलंबनाची कारवाई होईल या भीतीने हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.