मुंबई : संपामुळे एसटीची सेवा पूर्णत: ठप्प आहे. रत्नागिरीत सेवा कोलमडली असून कोल्हापुरात संपामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच आहेत. त्याशिवाय प्रवाशांची लूटही सुरु झालीय. खासगी बसेसनी अव्वाच्या सव्वा दर आकारायला सुरुवात केलीय. तर अहमदनगर येथे स्कूल बसचा आधार घेण्यात आलाय.


रत्नागिरीत सेवा कोलमडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी संपात रत्नागिरी जिल्ह्यातले सव्वातीन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे बहुतांश भागात जाणाऱ्या गाड्या जाऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यात दररोज १४९७ फेऱ्या  सोडण्यात येतात. मात्र आता ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. जिल्हाधिकारी यांनी संपकरी कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश एसटी प्रशासनाला दिले खरे पण त्याला देखील संबधित प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. 


भंडारा, गोंदिया जिल्ह्यात फटका


एस. टी. बंदचा फटका भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे. दिवाळी निमित्त घरी परत जात असलेल्या प्रवाशांचे यात मोठे हाल होत असून, दोन्ही जिल्हे मिळून जवळपास १३०० बस फेऱ्या इथे रोज होतात. 


तर दिवाळीच्या सणात प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन, २ ते अडीच लाखांपर्यंत जाते. या संपामुळे भंडारा-गोंदिया आगाराला  ४५ ते ५० लाखांचं नुकसान सहन करावं लागतयं.  कर्मचा-यांना कामावरून काढलं तरी, चालेल मात्र संप मागे घेणार नाही अशी भूमिका चालक आणि वाहकांनी घेतली आहे. 


पुण्यात संपात फूट


पुण्याजवळच्या भोर एसटी डेपोमधून ८ एसटी बसेस मार्गस्थ झाल्यायत.  पोलीस बंदोबस्तात या एसटी रवाना झाल्या. एसटीमधल्या कामगार सेनेचे कर्मचारी कामावर रुजू झालेत. कामगार सेना ही संपात सहभागी झाली नव्हतीच. पण गेले दोन दिवस संपक-यांचा दबाव असल्यानं एसटी बंद ठेवण्यात आल्या होत्या. आज संपक-यांचा दबाव झुगारुन अखेर आठ एसटी बसेस सकाळी मार्गस्थ झाल्यायत.


दोन दिवसात ५० कोटींचे नुकसान


एसटीचा संप आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या संपाचा मोठा आर्थिक  फटका बसलायाय. संपाच्या दोन दिवसांत एसटीचे ४५ ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता आजपासून एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसे संकेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत.  


संपाचा तिढा सुटणार कसा?


सध्याच्या घडीला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे एसटीच्या संपाचा तिढा सुटणार कसा? तीन दिवस उलटले तरी तोडगा दिसत नाहीय. सध्याच्या घडीला संप सुरू आणि चर्चा ठप्प अशी परिस्थिती आहे.