सातारा : राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पूकारला आहे. सातारा आगारात आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्य़ांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून, आंदोलक कर्मचाऱ्यांनी फाटकावर आडव्या लावलेल्या एसटी बसेस पोलिसांनी हलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या बसेस हलवता येऊ नयेत म्हणून चाकाची हवा सोडण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.


यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने निषेधाच्या घोषणा दिल्या. संपादरम्यान खासगी वाहनांची वर्दळ वाढली असली तरी सातारा बसस्थानकात यांना प्रवेश नाहीये.


सांगली बस स्थानकाच्या फलाटावर एसटी बसेसप्रमाणे उभ्या केलेल्या काळ्या पिवळ्या वडाप गाड्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर साता-यातही खासगी वाहनं आत पाठवायचा निर्णय प्रशासनानं घेतला. याला आंदोलनकर्त्यांनी कडाडून विरोध केला.



दरम्यान दर अर्ध्या तासाला सातारा ते पुणे, तसंच दर एक तासाला मुंबई, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती, सातारा विभाग नियंत्रकांनी दिली आहे. परिवहन महामंडळाच्या नियमावलीनुसारच तिकीट दरांचं नियोजन बसस्थानकात केलं जाणार आहे.