एसटी संपावर तोडगा निघाला, मात्र पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण?
उदय सामंत यांनी एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावली आहे.
मुंबई: एसटी संपाची कोंडी अखेर फुटली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एसटी संपाची कोंडी फोडण्यात यशस्वी भूमिका बजावली. उदय सामंतांनी एसटी कर्मचारी, खोत, पडळकर, परब, अजित पवार आणि शरद पवार यांच्याशी पडद्यामागे गाठीभेटी घेत यशस्वी मध्यस्थी केली.
15 ते 20 दिवसांनंतर अखेर या संपावर तोडगा निघत आहे. राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम होते. तर दुसरीकडे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी देखील बराच अवधी लागला. या दरम्यान अनेक चर्चा आणि भेटीगाठी देखील झाल्या. अखेर या संपावर आज तोडगा निघाला आहे.
एसटी संपाबाबत 8 दिवसांपूर्वीच उदय सामंत यांची सदाभाऊ खोत यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती. सरकार कर्मचाऱ्यांच्या बाजून असल्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं.
उदय सामंत आणि अजित पवार- शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उदय सामंत, शरद पवार, अजित पवार, अनिल परब आणि अधिकारी यांच्यात तब्बल एसटी संपाबाबत 4 तास चर्चा झाली.
उदय सामंत आणि सदाभाऊ खोत-एसटी कर्मचारी यांच्यात बैठक झाली. सामंत-खोत-परब आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेची फेरी झाली होती. मंगळवारी रात्री उदय सामंत, सदाभाऊ खोत, पडळकर यांच्य़ात बैठक झाली.
सह्याद्रीवर आज उदय सामंत यांनी एसटी संपावर झालेल्या बैठकीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अखेर एसटी संपावर तोडगा काढण्यात यश आलं आहे. उदय सामंत यांनी एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावली आहे.