Stamp Duty : मुंबईसह मेट्रो शहरात १ एप्रिलपासून इतक्या टक्क्यांनी वाढणार स्टँप ड्यूटी
Maharashtra Stamp Duty : महाराष्ट्र सरकारने १ एप्रिलपासून मुद्रांक शुल्कावर अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : महाविकासआघाडी सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोच्या कामकाजासंदर्भात बांधकामे सुरू आहेत त्यांच्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने दस्तऐवज नोंदणी आणि तारण व्यवहारावर १ एप्रिलपासून मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार (Metro cess) लावण्याचे आदेश दिले आहेत. (Stamp Duty will be increased from 1st April In maharashtra)
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कवाढीलाही विरोध होत आहे. जोपर्यंत मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत एक टक्का अधिभार लावू नये, अशी मागणी काही जणांनी केली आहे.
1 एप्रिलपासून 1% मुद्रांक शुल्क वाढणार
1 एप्रिलपासून, मुंबईसह अशा सर्व शहरांमध्ये 1% मुद्रांक शुल्क वाढणार आहे जिथे मेट्रो ट्रेन्स बांधल्या जात आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मुद्रांक शुल्काची रक्कम वाचवण्यासाठी मालमत्ता खरेदीतही झपाट्याने वाढ झाली आहे.
836 कोटींहून अधिक उत्पन्न
आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात 10,379 च्या तुलनेत एकट्या मुंबईत, या महिन्यात आतापर्यंत सुमारे 17 टक्के अधिक नोंदणी झाली आहे, म्हणजे 12,619. मार्च महिन्यात आतापर्यंत सरकारला 836 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
विक्रमी कमाई
सरकारच्या कमाईचा हा आकडा आणखी वर जाऊ शकतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. मुद्रांक शुल्कातील वाढ लागू होण्यास अजून दोन ते तीन दिवस शिल्लक असून, त्यामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नाचा हा विक्रमी आकडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिना - नोंदणी - उत्पन्न
जानेवारी - 8155 - 478 कोटी
फेब्रुवारी - 10379 - 615 कोटी
मार्च - 12619 - 836 कोटी