दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाचा शिरकाव राज्याच्या मंत्रीमंडळात वेगाने होताना दिसतोय. दरम्यान आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या मुख्य सचिव घरीच क्वारंटाईन आहेत.मुख्य सचिव हे अनेक बैठकांना हजर असल्याने प्रशासनाची सध्या चिंता वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील आठवड्यात मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर होते. यापूर्वी अनेक प्रधान सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 


या पार्श्वभुमीवर मंत्रालयात आता विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षण जाणवत असल्याने संजय कुमार यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. सौम्य लक्षणे जाणवू लागल्यापासून ते स्वतः विलगीकरणात गेले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल आला. 



तत्पुर्वी मंत्रीमंडळातील १२ जणांना कोरोना होऊ गेलाय आणि दोन मंत्री सध्या क्वारंटाईन आहेत.


कॉंग्रेस नेतेही अडचणीत 


काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवरही होण्याची शक्यता आहे. गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी एक. के. पाटील मुंबईत होते. काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात त्यांनी राज्यातील नेत्यांबरोबर बैठकीही घेतली होती.


राज्यातील रुग्णसंख्या वाढली 


राज्यात कोरोनाचे १८,०५६ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३८० कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६६% एवढा आहे. 


आज १३,५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. या आकड्यानुसार राज्यात आजपर्यंत एकूण १०,३०,०१५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९१% एवढे झाले आहे. 


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६५,६५,६४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,३९,२३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,६४,६४४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३०,४६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


देशातील रुग्णसंख्या 


गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८८,६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ११२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ९२,५३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,५६,४०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशातील ४९,४१,६२८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील ९४,५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.