जालना : कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यातली शिवसेना संपवायला निघाले आहेत असा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी, याबाबतची तक्रार वरिष्ठ शिवसेना नेत्यांकडे केलीय. चार वेळा लोकसभा निवडणुकीत दानवे शिवसेनेमुळेच विजयी झाले. मात्र, येत्या निवडणुकीत त्यांना पाडणार असल्याचा दावाही अर्जुन खोतकरांनी यावेळी केला. 


विशेष म्हणजे दानवेंवर भाजपच्याच वरिष्ठांचा विश्वास नसल्यानं, मातोश्रीवर अमित शाहांबरोबरच्या बैठकीला त्यांना येऊ दिलं नाही अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकरांनी दिलीय ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आजपर्यंत लोकांना फसवलंय. त्यामुळे लोक त्यांना चकवा म्हणतात असा थेट आरोपही खोतकरांनी केलाय. 


रावसाहेब दानवे जिल्ह्यातील सर्वात मोठे वाळू माफिया असून, जिल्ह्यातले सर्व मोठे अधिकारी दानवेंच्या दबावाखाली काम करतात असा आरोपही खोतकरांनी केला. हजारो कोटींच्या कामांचे जिल्ह्यातले ठेके दानवे कुटुंबाकडे असून, दानवे आपला जावई, भाऊ यांनाही जलसंधारण, तसंच रस्त्यांच्या कामांचे ठेके देत असल्याचा आरोप खोतकरांनी केला. 


रावसाहेब दानवेंनी मात्र खोतकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेतय. खोतकर स्वतःच शिवसेना संपवायला निघाल्याची टीका त्यांनी केलीये. तसे पुरावे दाखवणार असल्याचंही दानवे म्हणालेत.