सुरुवात त्यांनी केलीय शेवट मी करणार - सदाभाऊ खोत
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांचा आगळा वेगळा पैलू, पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पाहायला मिळाला.
पुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांचा आगळा वेगळा पैलू, पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पाहायला मिळाला. सदाभाऊ खोत यांचं स्वागत करण्यासाठी, इंदापूर तालुक्यामधल्या कळाशी गावात हलगी वाजवली जात होती. त्यासोबत राजू शेट्टींवर जोरदार टीकाही केली.
खोतांचं वेगळं रूप
सदाभाऊ खोत तिथे आले त्यावेळी हलगी वादकांच्या आकर्षक आणि तालबद्ध हलगी वादनानं सदाभाऊंनाही भूरळ घातली. त्यामुळे सदाभाऊंनाही हलगी वाजवण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी गळ्यात हलगी घेऊन इतर हलगी बहाद्दरांसह स्वतःही हलगी वाजवण्यासाठी ठेका धरला.
‘मी हेडमास्तर’
यावेळी बोलताना त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केलीये. ते म्हणाले की, ‘आंदोलनर्त्यांच्या शाळेचा मी हेडमास्तर आहे. सुरुवात त्यांनी केलीय शेवट मी करणार. दिल्लीत मुजरा घालायचा आणि गल्लीत बोंबलायचे अशीही टीका त्यांनी खासदार राजू शेट्टींवर केलीये.
खोतांच्या गाडीवर दगडफेक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात फारकत झाल्या पासून सतत दोघात काहीना काही घडत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर सदाभाऊ खोत असताना स्वाभानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊच्या गाडीवर गाजर फेकून आंदोलन केले होते त्याची खिल्ली उडवत आंदोलन करायचे त्या शाळेचा हेडमास्तरच सदाभाऊ खोत आहे.
काय म्हणाले खोत?
मी समाधानी माणुस आहे. मी माझ्या कामाची सुरुवात चांगल्या कामाने करतो पण आज सुरवात त्यांनी केलीय शेवट मी करणार आहे. दिल्लीत मुजरा घालायचा आणी गल्लीत बोंबलायचे अशा शब्दात राजू शेट्टी वर तोफ डागली. तर आंदोलनांनी प्रश्न मिटला तर यांचे दुकान कसे चालणार या शब्दात आज समाचार घेतला. सदाभाऊ खोत इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे रयत शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.