राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार; गृहमंत्र्यांचे संकेत
माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांची सूचना
मुंबई : पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पोलिसांच्या गणवेशात बदल झाल्यानंतर गणवेशात हाफ जॅकेटचा समावेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय लेदर बुटांऐवजी काळ्या रंगाचे स्पोर्ट शूज पोलिसांच्या गणवेशात दाखल होणार आहेत.
पोलिसांचा गणवेश गैरसोईचा असल्याची सूचना माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी दिली आहे. तर त्यांच्या सूचनेचा विचार करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान याआधी देखील पोलिसांच्या गणवेशात वेळो-वेळी बदल करण्यात आले होते.
काही वर्षांपीर्वी पोलिसांच्या टोपीत बदल करण्यात आले होते. तर आता पोलिसांचा पूर्ण गणवेश बदलण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यासंबंधी अनिल देशमुख आणि गृहराज्य मंत्री सतीश पाटील यांनी पोलीस दलातील माजी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यामुळे येत्या काळात खाकी वर्दीला झळाळी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.