लोकमान्य टिळकांच्या शाळेत कुत्र्यांची नसबंदी, नगर परिषदेचा प्रताप
रत्नागिरी नगर परिषदेच्या दोन नंबरच्या शाळेत सध्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा प्रताप सध्या नगर परिषदेने सुरू केलाय.
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे ठणकावून सांगणा-या लोकमान्य टिळक ज्या शाळेत शिकले त्या शाळेवरुन रत्नागिरीत वाद सुरु झालाय.. या वादाला कारण ठरलीय तो म्हणजे नगर परिषदेचा विचित्रपणा. रत्नागिरी नगर परिषदेच्या दोन नंबरच्या शाळेत सध्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा प्रताप सध्या नगर परिषदेने सुरू केलाय. त्यामुळे महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
ऐतिहासिक क्षणांची साक्षिदार असलेली ही शाळा धोकादाय असल्याचं कारण देत नगरपरिषदेने सध्या बंद ठेवली आहे. रत्नागिरी शहरात कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता नागरिकांच्या तक्रारींमुळे नगरपरिषदेनं कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. कराडच्या एका संस्थेला हे कंत्राट देण्यात आलं. मात्र नगरपरिषदेनं नसबंदीसाठी चक्क शाळेची जागा दिली. कुत्रे पकडण्यासाठी आणि ठेवण्य़ासाठी लोकमान्य टिळक शाळा क्रमांक २ ही सुरक्षीत असल्याचं नगराध्यक्षांनी म्हटले आहे. तर, महापुरुषाचा अवमान करण्याता हेतू नसल्याचे नगर परिषदेने म्हटले आहे.
कुत्र्यांची नसबंदी तर आवश्यक त्याबाबत वाद नाही. मात्र, त्यासाठी शाळेचा तेही राष्ट्रपुरुष ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा वापर करणे हे कितपत योग्य याचा विचार व्हायला हवा, असं स्थानिकांनी म्हटलं आहे.