स्टिंग ऑपरेशन : दिवसाढवळ्या मटक्याच्या अड्ड्यात आकड्यांचा खेळ
आकड्यांचा बाजार कसा रंगलाय, याची कल्पना विखुरलेल्या चिठ्ठ्यांवरून येईल...
सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : राज्यातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये अगदी भर बाजारात मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत... अशाच एका मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन 'झी २४ तास'नं केलेलं हे खास स्टिंग ऑपरेशन...
कायदा धाब्यावर बसवून मटक्याचे अड्डे कसे खुलेआम सुरू आहेत, हेच आम्ही तुम्हाला दाखवतोय... हा अड्डा आहे नांदेड शहरातला... कला मंदिर ते मिलगेट रोडवरचा... झी २४ तासच्या प्रतिनिधींनी या मटका अड्ड्यावर जाऊन खास स्टिंग ऑपरेशन केलं.
कसले पोलीस आणि कसला कायदा?
नांदेडच्या भररस्तीत अगदी मुख्य रस्त्याला खेटून हा मटक्याचा अड्डा इथं चालतोय. भल्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये, पोलिसांची किंवा कायद्याची कसलीही तमा न बाळगता, इथं कल्याण आणि मिलन मटक्याचा आकड्यांचा खेळ सुरू आहे... इथं जागोजागी पडलेल्या या चिठ्ठ्या पाहा... आकड्यांचा बाजार कसा रंगलाय, याची कल्पना विखुरलेल्या चिठ्ठ्यांवरून येईल...
आम्ही या एकाच मटक्याच्या अड्ड्याचं स्टिंग ऑपरेशन केलं... पण नांदेड शहरात आणखी बऱ्याच ठिकाणी असे मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. नांदेड बस स्थानक, खडकपुरा, गोकुळ नगर, महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणीही राजरोसपणे मटक्याचे अड्डे चालतात...
भरवस्तीत मटक्याचे अड्डे
गणेश विसर्जनानंतर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार असे अवैध धंदे सुरू झाल्यांचं चित्र आहे... आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे भरवस्तीत सर्रास सुरू असलेले हे मटक्याचे अड्डे पोलिसांना मात्र दिसत नाहीत...
या अवैध धंद्यावर नांदेड पोलिसांचा वचक अजिबात दिसत नाही... कदाचित मटका चालवणाऱ्यांकडून चिरीमिरी देऊन पोलिसांचे हात ओले केले जातात की काय? आणि त्यामुळंच पोलीस या अवैध धंद्यांकडं कानाडोळा करतात की काय? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.