आशिष भोईर, झी मीडिया, कल्याण : नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत डोक्यात दगडाने मारहाण केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये घडली आहे. मारहाणीत वाहतूक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून राहुल रोकडे असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सूरु असून आज संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. यावेळी राहुल रोकडे हा तरुण भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता. प्रकाश पटाईत यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण दुचाकीस्वार न थांबता पुढे निघून गेला. 


पण पुढे गेल्यानंतर काही अंतरावर गाडी लावून दुचाकीस्वार राहुल रोकडे परत मागे आला आणि त्याने वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. याचदरम्यान राहुल रोकडेने दगड घेऊन प्रकाश पटाईत यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात प्रकाश पटाईत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


आरोपींना पोलिसांचा धाक उरला की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.