सोलापूर : सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यात पडळकरांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र गाडीच्या काचेचं नुकसान झालं. या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संध्याकाळी पडळकर सोलापुरातील मड्डी वस्ती भागात घोंगडी बैठक घेण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तीनं पडळकरांच्या गाडीवर दगडानं हल्ला केला. सोलापुरात पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती तसंच त्यांच्या दिल्लीतल्या बैठकीची देखील खिल्ली उडवली होती. 


'गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही'


घोंगडी बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा 4 ते 5 लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. माझं इथं कुणाशीही शत्रुत्व नाही, तरीसुद्धा माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असेल तर माझा आवाज बंद होणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.