भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
ही घटना माणमध्ये घडली. साहिल भुट्टो अन्सारी असं हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बालकाचं नाव आहे. पिंपरी-चिंचवड जवळच्या मोहितेनगर भागात अन्सारी कुटुंब राहतं. सकाळी साडे-सहाच्या सुमाराला साहिल भुट्टो अन्सारी हा चिमुरडा घराच्या बाहेर गेला. त्याचवेळी पाच ते सहा कुत्र्यांच्या टोळक्यानं त्याच्यावर हल्ला केला.
त्याच्या कमरेचे लचके कुत्र्यांनी तोडले. त्याच्या आई वडिलांनी साहिलला माणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, तासभर त्याला तिथे उपचारच मिळाले नाहीत. त्यानंतर त्याला पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचे प्राण गेलेले होते. वेळीच उपचार मिळाले असते तर साहिलचे प्राण वाचले असते अशी प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.