डॉक्टरचं पडतायत `आजारी`; ताण-तणाव, जीवनशैलीचा डॉक्टरांना फटका
सामान्यांपेक्षा डॉक्टरांचं आयुर्मान कमी
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : तुमचा आमचा जीव वाचवणारे डॉक्टरच आता संकटात आले आहेत. सततच्या दगदगीमुळे डॉक्टरांच्या आयुष्यमानाची सरासरी कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टरांकडे जाता.. अनेकदा तर त्यांना देवाची किंवा देवदुताची उपमा दिली जाते. पण अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचं स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष असतं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुष्याच्या धकाधकीचा परिणाम आता डॉक्टरांच्याही आयुष्मानावर होऊ लागलाय.
एका सर्वेक्षणानुसार सामान्य नागरिकांपेक्षा डॉक्टरांचं आयुष्य कमी झाल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना अनेक आव्हान असतात. त्यात २४ तास रुग्णसेवेचं व्रत पाळायचं असतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून ह्रद्यविकार, ब्रेन स्ट्रोक, हायपरटेंशन, मधुमेह आदी आजारांनी डॉक्टरांना ग्रासलंय.
२००८ ते २०१८ या १० वर्षांच्या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या काळात २८२ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ८७ टक्के पुरुष आणि १३ टक्के महिला डॉक्टर होत्या. यापैकी २७ टक्के मृत्यू हे ह्रद्यविकाराने, २५ टक्के कर्करोगाने, २ टक्के इतर जंतूसंसर्गाने झाल्याचं समोर आलंय. तर १ टक्का डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचंही स्पष्ट झालंय.
सामान्य माणसाचं सरासरी आयुष्यमान ६५ ते ७० मानलं जातं. डॉक्टरांचं आयुष्यमान मात्र ५५ ते ६० वर्षांपर्यंत खाली आल्याचं हे सर्वेक्षण सांगतंय.
औरंगाबादच्या एका तरूण डॉक्टरलाही याचा नुकताच प्रत्यय आलाय. सततच्या धापपळीने त्यांना ह्रद्यविकाराचा त्रास सुरु झाला आहे. सततच्या तणावामुळे हृदयावर ताण येतो. त्यात बदललेल्या जीवनशैलीमुळे भर पडल्याचं हृदयरोगतज्ज्ञ सांगतात.
वैदकीय व्यवसायात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. मोठं हॉस्पिटल काढणं, ते चालवणं, रात्री अपरात्री पळापळ करणं, पेशंट वाचवण्याचा ताण, डॉक्टरांना होणारी मारहाण, या सगळ्याचा दुष्परिणाम डॉक्टरांच्या आयुर्मानावर होतोय.
डॉक्टर सगळ्यांनाच तब्येत सांभाळण्याचा सल्ला देतात. मात्र धावपळीत त्याचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्याचं समोर आलंय. डॉक्टरांनी इतरांना चांगलं जगण्याचा सल्ला देतांना स्वतःकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे.