दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताप्रकणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुन्हा चुकीचं काम करण्याचं बिल्डरांचं धाडस व्हायला नको अशी कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून 15 मजूर ठार झाल्याप्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्याची चर्चा होते. नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं. बांधकाम व्यावसायिक दोन-तीन महिने बेपत्ता राहतात आणि पुढे काहीही होत नाही, याकडे अजित पवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. बांधकाम करताना बिल्डर महापालिकेच्या बांधकाम नियमावलीकडे दुर्लक्ष करतात. गुंठेवारीची हजारो बांधकामं कोंढवे परिसरात सुरू आहेत. त्या ठिकाणी सुरक्षेचे कुठलेही निकष कामगारांसाठी पाळले गेले नाहीत. कामगारांची बांधकाम व्यावसायिकाने नोंदच ठेवली नसल्याने त्यांना मदत मिळण्यातही अडचणी येत आहे. बिल्डर करोडो रुपये कमवतात आणि संरक्षक भिंत कमकुवत बांधतात. याप्रकरणात जे कुणी बिल्डर असतील त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी पवार यांनी विधानसभेत केली. हे काम सुरू असताना सोसायटीने महापालिका आणि पोलीसांकडे तक्रार केली होती पण त्यांनी दुर्लक्ष केल्याचं अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं.


कोंढवा दुर्घटनेतील संरक्षक भिंत खचली होती म्हणून सोसायटीतील नागरीकांनी चार महिन्यांपूर्वी बिल्डरकडे भिंत बांधून देण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे बिल्डरने दुर्लक्ष केलं. महापालिका आयुक्तांकडेही सोसायटीने इमेलद्वारे तक्रार केली होती. मात्र महापालिका आयुक्तांचे याकडे दुर्लक्ष झाले असेल तर यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही,  असे सांगत याप्रकरणी जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. या बांधकामाला ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्यांविरोधातही कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 



कोंढवा दुर्घटनेतील जबाबदार बिल्डरला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. तसेच हे बांधकाम पुढे करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली. कोंढवा परिसरात बेकायदेशीर बांधकामे आहेत. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या बांधकामांना पायबंद घाला अशी मागणीही वळसे-पाटील यांनी केली आहे.