MPSC Exam : पेपर (MPSC Paper) अवघड गेल्याने एका तरुणाने आपलं जीवन संपल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed News) उघडकीस आली आहे. हा तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेसाठी तयारी करत होता. मात्र रविवारी झालेल्या परीक्षेनंतर या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 घेण्यात आली. राज्यातील चार लाख 67 हजार 85 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. एकूण आठ हजार 169 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र पूर्व परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी (Beed Police) घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. अक्षय अप्पा पवार असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव असल्याचे समोर आले आहे. अक्षय मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी होता. गेल्या काही वर्षांपासून अक्षय छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससी परीक्षांची तयारी करत होता. 30 एप्रिल रोजी तो परीक्षा देण्यासाठी बीड येथे आला होता. पेपर दिल्यानंतर रविवारी संध्याकाळी अक्षय मित्राच्या खोलीवरच थांबला होता. पेपर अवघड गेल्याने तो चिंतेत होता. 


पेपर अवघड गेल्याचे अक्षयच्या मनाला इतकं लागलं की त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. अक्षयने मित्राच्या खोलीतच गळफास घेत आत्महत्या केली. मित्रांना हा प्रकार समजताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. शिवाजीनगर पोलिसांनी अक्षयच्या घरच्यांना ही माहिती देताच त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.


अक्षयाच्या कुटुंबियांनी रुग्णालयाकडे धाव घेत एकच टाहो फोडला. अक्षयला मृतावस्थेत पाहून त्याच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. अक्षयच्या मृत्यूनंतर त्याच्या गावासह एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.


दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 4 लाख 67 हजार 85 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1 हजार 475 परीक्षा उपकेंद्रांवर ही परीक्षा झाली होती. या परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण 8 हजार 169 पदे भरली जाणार असून, आयोगामार्फत विज्ञापित केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च पदसंख्या आहे.