Success Story Of Marathi Brand: दरवर्षी साधारण दिवाळी होऊन गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते नव्या कॅलेंडरचे म्हणजेच दिनदर्शिकेचे. त्यातही आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे जणू समीकरणच झालं आहे. मराठी माणूस उद्योग धंदा करु शकत नाही हा भ्रम मोडू काढणाऱ्या काही सर्वात यशस्वी कंपन्यांमध्येही कालनिर्णयचा आवर्जून उल्लेख केला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये 'भिंतीवरी कालनिर्णय असावे' हे तीन शब्द कधी ना कधी, कुठे ना कुठे ऐकायला मिळतातच. भारतीय संस्कृतीशी जोडणारा एक प्रमुख धागा म्हणून आजच्या टेक्नोलॉजिकच्या जगात अगदी अॅपच्या माध्यमातून मोबाईलवरील स्क्रीनपर्यंत पोहोचलेल्या कालनिर्णयचा प्रवास थक्क करणारा आहे. चला याचबद्दल जाणून घेऊयात...


कधी आणि कशी झाली सुरुवात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालनिर्णयची स्थापना 1976 साली ज्योतिषाचार्य जयंत साळगावकर यांनी केली. अवघ्या 2600 रुपयांच्या भांडवलावर त्यांनी हा उद्योग सुरु केला. आज आपण आवर्जून कालनिर्णय घेत असलो तरी तो काळ असा होता की त्यावेळेस मोफत मिळणारं पंचांग अशा नव्या फॉरमॅटमध्ये विकण्याची कल्पनाच मोठी धाडसी होती. मात्र साळगावकरांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी केवळ पंचांग आणि कालगणनेसाठीचं माध्यम न ठेवता ते अधिक रंजक करण्यासाठी त्यामध्ये अनेक नवे प्रयोग केले.


युएसपी ठरलं मागचं पान


साळगावकरांनी कालनिर्णयमध्ये प्रत्येक महिन्याच्या मागील पान हे विशेष लेखांसाठी वापरण्याचा अनोखा प्रयोग केला आणि तो सुपर हीट ठरला. आरोग्य, सौंदर्य, स्वादिष्ट, भविष्य, ग्रहाणाविषयीची माहिती, संगोपन, किचन टीप्स यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश साळगावकरांनी या मागच्या पानावर केला. या मागच्या पानाचीही लोक आतुरतेने वाट पाहू लागले. त्यामुळे अर्थातच कालनिर्णयवरील जबाबदारी वाढली आणि ते सुद्धा अधिक सकस कंटेट देऊ लागले. 


एकूण किती प्रती विकल्या जातात? किती भाषांमध्ये होतं प्रकाशित?


आजच्या घडीला कालनिर्णय हे सर्वाधिक खपाचं प्रकाशन आहे. दरवर्षी कालनिर्णयच्या दिड कोटींहून अधिक प्रती विकल्या जातात. कालनिर्णय हे मराठी, इंग्रजी, हिंदीसहीत एकूण 9 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काळाची पावलं ओळखत कालनिर्णयने वेबसाईट, अॅप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन जनरेशनमध्येही आपली ओळख कायम ठेवली आहे. 2600 रुपयांपासून सुरु झालेल्या या कंपनीची आजची वार्षिक उलाढाल ही 55 कोटी रुपयांहून अधिकची आहे. 


कालनिर्णयनंतर 40 ब्रॅण्ड आले पण...


ऑडीट ब्युरो ऑफ सर्क्युलेशननुसार कालनिर्णय हे जगातील सर्वात जास्त विकले जाणारे प्रकाशन आहे. कालनिर्णयनंतर भारतामध्ये एक दोन नव्हते तर तब्बल 40 ब्रॅण्डने दिनदर्शिका सुरु केल्या. मात्र यापैकी कोणत्याही दिनदर्शिकेला कालनिर्णय इतकं यश मिळवता आलेलं नाही. यावरुनच साळगावकर कुटुंबाचं या श्रेत्रातील काम आणि मत्तेदारी अधोरेखित होते. कालनिर्णयच्या माध्यमातून एक मराठमोळा ब्रॅण्ड आज जगभरात पोहचल्याचं पाहायला मिळत आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.