नाशिकमध्ये तरुणांच्या आत्महत्यांची संख्या वाढली
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात आत्महत्यांचं प्रमाण वाढलं
किरण ताजणे, नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्याच्या घटना वाढत आहेत. सोमवारी जुन्या नाशिक आणि इंदिरानगर परिसरातल्या तिघींनी आत्महत्या केली आहे. त्यात एका विवाहितेसह दोन तरुणींचा समावेश आहे. या आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. नाशिक शहरात 1 जानेवारीपासून वेगवेगळ्या भागात 46 आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांच्या आत्महत्यांचा समावेश आहे. सोशल मीडियाचा अतीवापर आणि घरातला कमी होणारा संवाद, त्यासाठी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
याआधी प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये तरुण स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोप आलं होतं. जगातल्या ३ पैकी एक आत्महत्या करणारी स्त्री ही भारतीय असते. विशेष म्हणजे विवाहित तरुण स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे. लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलनं प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार भारतात झालेल्या आत्महत्यांपैकी 63 टक्के तरुणांनी केलेल्या आहेत. भारतीय तरुणाईच्या मृत्यूचं सर्वांत मोठं कारण आत्महत्या असल्याचं देखील समोर आलं आहे.
मागील काही वर्षांमध्ये भारतात देखील आत्महत्यांची संख्या वाढली आहे. 15 ते 39 वयोगटात आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांची संख्या यात जास्त आहे. 2016 मध्ये जवळपास दीड लाख तरुणांनी आत्महत्या केली होती. मानसिक तणाव हे अर्थातच आत्महत्येचं मुख्य कारण बनत आहे. महिनाभरात नाशिकमध्ये 46 आत्महत्या झाल्या आहेत. ही आकडेवारी नक्कीच धक्कादायक आहे. त्यामुळे पालकांनो, मुलांकडे लक्ष ठेवा, मित्र-मैत्रिणींनो तुमच्या मित्र-मैत्रिणींकडे लक्ष ठेवा.