मुंबई : ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षात वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. याच बदलांमुळे कधी उन्हाळ्यात-पावसाळा तर हिवाळ्यात-उन्हाळा असा अनुभव तुम्हा आम्हाला नेहमीच येतोय. अशातच आता येत्या काळात उन्हाळ्याचा कालावधी तब्बल सहा महिन्यांचा असेल असा गंभीर इशारा शास्त्रज्ञांनी  दिलाय. चीनमधल्या विज्ञान अकादमीनं वातावरणातल्या बदलांवर संशोधन करून जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार भविष्यात वातावरणात कसा बदल होईल याविषयीचा अंदाज बांधण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार....


उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याचा कालावधी 78 दिवसांवरून 95 दिवसांपर्यंत वाढलाय. तर हिवाळ्याचा कालावधी 76 दिवसांवरून 73 दिवसांपर्यंत कमी झाला आहे. वसंत ऋतूचा कालावधीही 124 दिवसांवरून 115 दिवसांवर आला आहे. तर शरद ऋतूचा कालावधी 87 दिवसांवरून 82 दिवसांपर्यंत कमी झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. 


वातावरणातील बदलाचा वेग कायम राहिल्यास या शतकाच्या अखेरीस उत्तर गोलार्धात हिवाळा अवघ्या दोन महिन्यांचा तर उन्हाळा सहा महिन्यांचा असेल...1952 ते 2011 पर्यंतच्या नोंदींचा अभ्यास करत संशोधकांनी हा अहवाल मांडला आहे.


वैज्ञानिकांचं हे संशोधन वातावरणातल्या बदलांपुरताच मर्यादित नाही. तर या बदलांमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही संशोधकांनी वर्तवलीय. उन्हाळ्याचा कालावधी वाढल्यानं अन्नधान्य उत्पादनात घट होऊ शकते. शिवाय पक्षी स्थलांतराचा कालावधीही बदलू शकतो. वनस्पती उगवण्याच्या कालावधीत बदल झाल्यास त्याचा परिणाम वन्यजीवांवरही होऊ शकतो अशी भीतीही या अहवालातून वर्तवण्यात आलीय. निसर्गाची हानी टाळण्यासाठी जगभरातून सार्वत्रिक प्रयत्न झाले तर हा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकानं निसर्गाबाबत वेळीच सजग होण्याची गरज आहे.