प्रशांत परदेशी, झी २४ तास, नंदूरबार : सर्वसामांन्यांना नाहक त्रास देणारे, चिरीमिरी घेऊन तोडपाणी करणं अशी जनमाणसात पोलिसांची प्रतिमा आहे. मात्र मोजक्या काही जणांमुळे संपूर्ण खातं हे बदनाम होतं. सर्वच पोलीस हे भ्रष्टाचारी नसतात, काही पोलीस कर्मचारी हे खात्याचं नाव उंचावणारेही असतात. आम्ही तुम्हाला जी घटना सांगतोय, ते पाहून तुम्हीही या पोलिसांना कडक सॅल्युट ठोकाल. (superintendent police p r patil and his team collect and give 50 thousand ruppes to padma koli)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचं झालं असं की एका आजोबांचे 50 हजार चोरीला गेले. चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला. शोध सुरु आहेच. पण आजोबांची गरिबी बघून पोलिसांनी वर्णगी काढून त्यांना पैसे परत दिले. नेमकं कुठे घडलंय खाकीतल्या माणुसकीचं दर्शन हे पाहुयात. 



पदम कोळी, नंदुरबारच्या डामरखेडा गावचे रहिवाशी. संजय गांधी निराधार योजनेवर कोळींचं घर चालतं. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे त्यांच्या पत्नीचं निधन झालं. होते-नव्हते तेवढे पैसे उपचारात संपले होते. 50 हजारांच्या मदतीची माहिती समजल्यावर त्यांनी पायऱ्या झिजवल्या. त्यांना ही मदत मिळाली. 


बँकेतून पैसे काढून घरी जात असताना चोरट्यांनी त्यांच्याकडचे 50 हजार लांबवले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी स्थानिक वर्तमानपत्रात पदम कोळींची व्यथा वाचली आणि त्यांना आपल्यासमोर हजर करण्याचे आदेश दिले. 


कोळी आजोबांच्या घरासमोर पोलीसांची जीप लागली आणि सगळं गाव चिंतेत पडलं. घाबरत घाबरतच ते पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले आणि त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. पोलीसांनी वर्गणी काढून त्यांच्यासाठी जमवलेले 50 हजार रुपयेच पाटील यांनी त्यांच्या हातावर ठेवले. पोलीस अधीक्षक पाटील यांनी मात्र केवळ सामाजिक भावनेतूनच हे केल्याचं सांगितलं.  


एरवी चिरीमिरी मागणारे किंवा विनाकारण भाव खाणारे अशी पोलिसांची जनमानसात प्रतिमा आहे. मात्र कधीकधी खाकीतल्या माणुकीचं असं दर्शन घडतं आणि वरपांगी कडक वाटणाऱ्या पोलिसांचं मनही हळवंच असतं हे सिद्ध होतं. नोकरीच्या पलीकडे जाऊन माणूसकी आणि सामाजिक भावनेतून पोलिसांनी जे काही केलंय, यासाठी त्यांना पुन्हा एकदा खणखणीत कडक सॅल्युट.