आज फैसला । नवनीत राणा यांची खासदारकी जाणार की राहणार?
Navneet Rana caste certificate News : अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्याबाबत महत्वाची बातमी. नवनीत राणा यांची खासदारकी जाणार की राहणार? याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुंबई / अमरावती : Navneet Rana caste certificate News : अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्याबाबत महत्वाची बातमी. नवनीत राणा यांची खासदारकी जाणार की राहणार? याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खासदारकीचा अंतिम निर्णय आज होणार आहे.
खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा ठपका ठेवत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी या जात प्रमाणपत्र विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर स्थगिती देण्यात आली होती. बोगस जात प्रमाणपत्रावर अंतिम निर्णय येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगन आदेश दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील जात वैधता संदर्भातील अंतिम सुनावणी आज होत आहे. त्यामुळे काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अमरावती लोकसभा सदस्य नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. कारण बनावट कागदपत्रे वापरून फसवणूक केली गेली आणि त्यांना सहा आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच न्यायालयाने खासदाराला दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. याविरोधात नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या.
नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेला ‘मोची’ जातीचा (Mochi caste) दावा फसवा होता आणि अशा प्रवर्गातील उमेदवाराला लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने केला होता, असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते. या निकालामुळे नाराज झालेल्या नवनीत यांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
माजी मॉडेल आणि अभिनेत्री नवनीत राणा यांनी अमरावती (SC-राखीव) मतदारसंघातून काँग्रेस-NCP आणि RPIच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. अडसूळ यांनी नंतर मुंबईच्या उपजिल्हाधिकार्यांनी 30 ऑगस्ट 2013 रोजी दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यात नवनीत या 'मोची' जातीच्या (Mochi caste) आहेत असे म्हटले होते.