शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उफाळून आलाय. संभाजी भिडे यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी  एका महिला पत्रकाराने (journalist) त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी 'आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,' असे संभाजी भिडे यांनी म्हटले. तसेच महिला पत्रकारासोबत संवाद साधण्यास त्यांनी नकार दिला. संभाजी भिडे (sambhaji bhide) यांच्या वक्तव्यानंतर आता सर्वच क्षेत्रातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. राज्य महिला आयोगानेही (Maharashtra State Commission for Woman) याची दखल घेत त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करण्यास सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले संभाजी भिडे?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांनी संभाजी भिडे (sambhaji bhide) यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली? असा प्रश्न विचारला. यावर भिडे यांनी "तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे," असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सूचक शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी एक कविता पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


तू आणि मी ....


मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली 


मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू


तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ


तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा 
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा


मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल


तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो 


मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का...!!!


मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास .....!!!!!


- हेरंब  कुलकर्णी


दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी "संभाजी भिडे यांनी यापूर्वीही आंबे खाल्याने मुलं होतात, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे," असे म्हटले आहे.


"ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसेच, संभाजी भिडेंना महिला आयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा," असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.