Supriya Sule Reaction On Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी 7.15 वाजता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. आता यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. पुण्याला मंत्रिपद मिळालंय याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पुण्यात प्रशासन नाही. आज मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पुण्यात पाणी तुंबतय. ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज सुरु आहे. पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करा. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रीपद मिळालंय, त्याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.   


सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा


"यापुढे देश संविधानानेच चालेल, हे देशातील जनतेने दाखवून दिले आहे. पन्नास खोके इज नॅाट ओके हे जनतेने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जबाबदारी वाढली. युगेंद्र पवार हे कुस्तीचे काम चांगले करत होते. त्यांना हटवने दुर्दैंवी आहे. त्यांना काढता येते का नाही हा देखील प्रश्न आहे. गेल्या 25 वर्षात आमचा पक्ष स्वत:च्या कर्तृत्वाने सत्तेत राहिला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा", अशी अपेक्षाही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे. 


यावेळी सुप्रिया सुळेंना अजित पवार गटाला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळेंनी मी दुसऱ्याच्या घरात डोकावून बघणार नाही, असे म्हटले. भाजप सहयोगी पक्षांना कसं वागवते हे आम्ही जवळून पाहिले आहे. 


पुण्यामध्ये पावसामुळे लोकांचे हाल


पुण्यामध्ये पावसामुळे लोकांचे हाल झाले. सलग तीन वेळा पाणी साचलं. या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार आहे. महापालिकेच्या निवडणुका घ्या म्हणून आम्ही मागे लागलोय. पण निवडणूक घेत नाहीत. महाविकासआघाडीमध्ये किंवा काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना आम्ही मान, सन्मान, टॅलेंट वर आम्ही मंत्रीपदं दिली होती. गेली सात वर्षे सगळीकडे त्यांची सत्ता होती. त्यामुळे करांच्या प्रश्नांना तेच जबाबदार आहेत, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.