मालेगाव : पूर्व लडाखच्या सीमेवरुन भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली. गलवान खोऱ्यात चीन सैन्यांकडून हिंसक झडप घालण्यात आली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-चीन सीमेवर तणाव सुरु असलेल्या गलवान घाटीमध्ये कर्तव्य बजावत असतांना मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील सचिन विक्रम मोरे या जवानाला वीरमरण आले. या वृत्तानंतर साकुरी गावात शोककळा पसरली आहे. गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात भारतीय लष्करातील दोन जवान पाण्यात पडले. ते वाहून जात असताना त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न जवान सचिन मोरे यांनी प्रयत्न केला. मात्र, जवान सचिन मोरे यांनाही वीरमरण आल्याची घटना काल घडली.



सचिन मोरे हे ११५ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते. आज सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली. सचिन मोरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. मोरे हे यांची एक वर्ष सेवा बाकी होती. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच साकुरी गावावर शोककळा पसरली आहे.