१८०० फूट खोलीच्या कोकणकड्यावरून ९ वर्षांच्या चिमुरडीचं चित्तथरारक रॅपलिंग
पुण्याच्या स्वानंदी तुपे या चिमुरडीच्या थरारक रॅपलिंगवरचा हा स्पेशल रिपोर्ट...
कैलास पुरी, झी २४ तास, पुणे : हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा अनेक ट्रेकर्सना आकर्षित करतो. तब्बल १८०० फूट खोली असलेल्या या कोकण कड्यावर पुण्याच्या स्वानंदी तुपे या अवघ्या ९ वर्षीय चिमुकलीने रॅपलिंग करत सगळ्यांनाच आश्चर्य चकित केलंय. १८०० फूट खोली पाहिल्यावर आपला श्वास रोखल्याशिवाय राहणार नाही... ही खोली उघड्या डोळ्यांनी पहायची म्हटलं तरी भीती वाटू शकते. मात्र याच १८०० फूट खोलीच्या कोकण कड्यावर स्वानंदीनं रॅपलिंग केलंय.
१० डिसेंबरला स्वानंदी आणि तिचे वडील सचिन तुपे यांनी सकाळी साडे नऊला रॅपलिंग सुरू केलं. पहिला टप्पा होता ९०० फुटांचा... या टप्प्यात 'ओव्हरहँग' म्हणजेच लटकत जावं लागतं. स्वानंदीने तो अर्ध्या तासांत पूर्ण केला.
पुढचा टप्पा ६०० फुटांचा... तिने हा टप्पा केवळ १० मिनिटांत आणि ३०० फुटांचा तिसरा टप्पा तिने ८ मिनिटांत पूर्ण केला.
रॅपलिंग केल्यानंतर अतिशय खडतर अशा वाटेतून साडे पाच तास भ्रमंती करून तिने ही मोहीम पूर्ण केली. गुरुवारी १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असतो. शरद पवार यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यासाठी रॅपलिंग केल्याचं स्वानंदीचे वडील सचिन तुपे यांनी म्हटलंय.
स्वानंदीने या पूर्वी अवघड असा लिंगाणा सर केला होता. आता १८०० फुटांच्या कोकणकड्यावर रॅपलिंग करत तिने आणखी एक केलेली ही धाडसी मोहीम नक्कीच कौतुकास्पद आहे.