मुंबई : महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने थैमान घातले असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसात स्वाईन फ्लूमुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला. जानेवारीत ही संख्या चार हजार ८१० असून, ६ सप्टेंबरपर्यंत ही संख्या ५१९ इतकी झाली होती. 
देशभरातील  स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णांची संख्या बघता परिस्थिती चिंताजनक आहे. तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूने ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पुण्यात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. या गंभीर परिस्थितीमुळे राज्यात  दररोज सरासरी १४ हजार ५८१ जणांची तपासणी करण्यात येत असून, त्यात दररोज ५३ रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूचे विषाणू आढळून आले आहेत. राज्यपातळीवर स्वाईन फ्लूबाबत अभ्यास करणारी समिती स्थापन करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यभरात सुमारे १५ लाख १ हजार १६४ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. स्वाईन फ्लूची लागण रोखण्यासाठी दररोज साधारण ३८३ संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर हे औषध दिले जाते. सध्या जिल्ह्य़ांतील विविध रुग्णालयांत या आजाराचे ५०२ रुग्ण दाखल आहेत. त्यामध्ये पुणे, नागपूर, चिंचवड मनपा, अहमदनगर येथील रुग्णांचा समावेश आहे.


मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग इत्यादी आजार असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण होण्याची शक्यता अधिक असते. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांनीही स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी पोषक आहार, व्यायाम यांचा अवलंब करणे आवश्यक आहे.