`रिश्वत मत लेना, नही तो गब्बर आ जायेगा`; संभाजीनगरमध्ये गब्बरच्या पत्रानं खळबळ
संभाजीनगर पोलिसांना आलेल्या एका पत्रानं एकच खळबळ उडवून दिली आहे. आता तुम्ही म्हणाल हे पत्र कुणाचं आहे? तर हे पत्र आहे चक्क गब्बरचं... लाच घेऊ नका, अन्यथा गब्बर येणार असं म्हणत गब्बरनं थेट धमकीवजा इशाराच दिलाय.
Chhatrapati Sambhaji Nagar News : गब्बर म्हटलं की आपल्या दोन गब्बर आठवतात... एक शोलेमधला अंगाचा थरकाप उडवणारा अमजद खानचा गब्बर.. तर दुसरा गब्बर सिनेमातला भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ अक्षय कुमारचा गब्बर... आता आणखी एका गब्बरची एन्ट्री संभाजीनगरमध्ये झालीय. या गब्बरनं थेट पोलिसांना पत्र पाठवून सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते पदाधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा दिलाय...
बिडकीन पोलीस स्टेशनला गावगुंड आणि पालकमंत्र्याचे उजवे हात याचं ऐकून आणि भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांची गळचेपी करताहेत. भ्रष्टाचारी अधिकारी आणि भ्रष्टाचारी नेते या सगळ्यांचं हत्याकांड मी घडवणार आहे.माझ्याकडे 100 जणांची गँग तयार आहे. कारण माझा कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास उडालाय. मी स्वतः माझ्या हाताने न्याय करणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अत्याचार घडला आणि आरोपी जर संदीपान भुमरेंचे समर्थक असतील आणि पालकमंत्र्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग भुमरेंच्या गाड्या RPG लाँचरने आणि AK47 ने उडवून देईल.
या गब्बरनं पालकमंत्री संदीपान भुमरेंनाच धमकी दिल्यानं संभाजीनगरमध्ये खळबळ उडालीय. मात्र आपण असल्या धमक्यांना घाबरत नसल्याचं भुमरे म्हणालेत.. दुसरीकडं या अज्ञात गब्बरवर कारवाई करण्याचा इशारा संभाजीनगरच्या पोलीस अधिक्षकांनी दिलाय. पत्रातल्या गब्बरच्या मागण्या योग्य असल्या तरी त्यानं स्वीकारलेला मार्ग निश्चितच चुकीचा आहे. त्यामुळं हा जो कुणी गब्बर आहे, त्याचा छडा पोलिसांनी लवकरात लवकर लावायला हवा...
सर्वसामान्य नागरिकांना मात्र या गब्बरचे स्वागत केले आहे, वाढलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी असले गब्बर हवेच असल्याचं नागरिक सांगताय. भ्रष्टाचार वाढलेला आहे त्याची चर्चा ही जोरात आहे , तो कमी व्हावा असेही जनतेचे म्हणणे आहे मात्र गब्बर सारख्यानी निवडलेला हा मार्ग कितपत योग्य आहे याचीही चर्चा होण्याची गरज निश्चित आहे.